श्रीक्षेत्र वडवाळ व श्रीक्षेत्र मोहोळ येथील यात्रेमध्ये प्रमुख सोहळ्यात खर्गेमहाराजांच्या मस्तकावर ही पांढरी छत्री असते. नागेशभक्त हेगरस श्रींच्या भेटीसाठी व दर्शनासाठी सद्गुरु प्राप्तीसाठी एकच ध्यास घेऊन माहुरगडावर गेले. तिथे सद्गुरुप्राप्तीसाठी देवीची मनोभावे आराधना केली. देवी प्रसन्न झाल्यानंतर भक्त हेगरसांनी मला सद्गुरुंचे दर्शन घडवा, अशी आर्त विनवणी केली. त्यावेळी देवी जगदंबेने त्यांना योगमायेने मानस सरोवराकाठी नेले व सांगितले, “तुझे सद्गुरु लाकडाच्या घोड्यावर बसलेले असतील, त्यांच्या हाती सर्पाचे चाबूक असतील व ते खाली येतील व त्या लाकडी घोड्यास पाणी पाजतील. त्यावेळी तू त्यांचे चरण धर. मी त्यावेळी तुझ्या सद्गुरुंच्या डोक्यावर पांढरी घार होऊन फिरेन म्हणजे तू तुझ्या सद्गुरुंना लगेच ओळखू शकेल अन् काही वेळातच सद्गुरु नागनाथ खाली लाकडी घोड्यासह अवतरले. भक्त हेगरसांनी त्यांचे चरण घट्ट पकडले. भक्त हेगरसांना श्री नागनाथांनी खूप फटके मारले, मात्र ते चरण सोडायला तयार नव्हते. श्री नागनाथांनी आश्चर्यचकीत होऊन वर पाहिले तर त्यांच्या मस्तकावर पांढरी घार अर्थात जगदंबा रेणुका माता होती. मग त्यांनी भक्त हेगरसास कुरवाळून हृदयाशी घट्ट धरीत अलिंगन दिले. याच श्री जगन्माता रेणुकाचे प्रतीक, खूण म्हणून खर्गेमहाराजांच्या मस्तकावर पांढरी छत्री धरतात. श्रीक्षेत्र वडवळ व मोहोळ येथील यात्रेत पांढरी छत्री असते. भाविक या जगन्माता रेणुकाचे मनोभावे दर्शन घेतात. ही छत्री धरण्याचा मान वडवाळ येथील कोळी घराण्याला आहे. श्रीक्षेत्र मोहोळ नागनाथ मंदिरातून सायंकाळी ५.३० वाजता छत्रीचे वडवाळकडे प्रयाण होते. त्यावेळी मोहोळ वडवाळ येथील सर्व संतमंडळी, मानकरी, भक्तगणांसोबत भजन म्हणत मोहोळ येथील गवत्या मारुती मंदिरापर्यंत येतात. तिथे आरती करून प्रसाद वाटला जातो. त्यावेळी मोहोळकर सर्व वडवाळकरांना चहापान करून जड अंतकरणाने निरोप देतात व समस्त वडवाळकर मार्गस्थ होतात.