Wadwal Nagnath

Our Festival

श्रीकृष्ण जयंती : गोपाळकृष्ण मंदिर

August 15, 2025

श्री नागनाथ मंदिराच्या दक्षिणेला सुरेख असे गोपाळकृष्ण मंदिर आहे. या मंदरामधील श्रीकृष्णाची मूर्ती नेत्रदीपक आहे. महादेवाच्या पिंडीवर उभी असलेली श्रीकृष्णाची मूर्ती हरिहर सांप्रदायाचे उत्तम उदाहरण आहे. श्रीकृष्णाला मिशा असून दंडावर व मस्तकी नाग धारण केलेले आहेत. अशी मूर्ती क्वचितच पहावयास मिळते. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने श्रीकृष्ण जयंती, गोपाळकाला इथे श्रद्धेने साजरा होतो.

आख्यायिका

श्री नागनाथांचे शिष्य हेगरस यांचे कुलदैवत गोपाळपूर, ता. पंढरपूर येथील गोपाळकृष्ण मंदिर. भक्त हेगरस नित्यनेमाने वडवाळ येथून श्रींची सेवा करून दर्शनासाठी पायी गोपाळपूरला जात. असे अनेक वर्षे चालले होते. एकदा श्री नागनाथांनी आपल्या शिष्याचे हे हाल न पाहवल्यामुळे त्यांनी हेगरसास सांगितले, ‘थांब ते मंदिरच इथे वडवाळाला मी आणतो, तुला जाण्या-येण्याचे कोणतेही श्रम नको व्हायला’ असे म्हणत अलगद गोपाळपूरहून हे मंदिर याठिकाणी आणले अशी आख्यायिका सांगितली जाते.

हेमाडपंथी बांधकाम असलेले हे मंदिर अतिशय सुरेख आहे. याचठिकाणी भक्त हेगरसांनी संजीवन समाधी घेतली. ती समाधी देखील या ठिकाणी आहे. ह्या समाधीसमोर भक्त हेगरसांनी श्री नागनाथांसमोर शिरकमळ अर्पण केल्याची प्रतिकृती आहे. श्रीकृष्ण मंदिरात श्रावण पौर्णिमेपासून अखंड हरीनाम सप्ताहास प्रारंभ होतो. अष्टमीदिवशी रात्री ९ ते १२ वाजता भजन, श्रीकृष्णं जन्मोत्सव सोहळा होतो. रात्री १२ ते पहाटेपर्यंत भजन, भारुड कार्यक्रम होतो. नगरप्रदक्षिणा होऊन सकाळी ८ वाजता मंदिरात दहिहंडी सोहळा होतो व प्रसाद वाटप केला जातो. या कालावधीत अखंड वीणा-वादन होत असते. दररोज भजन-कीर्तन होत असते.