श्रावण मास हा शिवभक्तांच्या भक्तीचा अनोखा सोहळाच. प्रत्येक श्रावण सोमवारी पहाटे श्रींच्या मूर्तीस अभिषेक केला जातो. पूर्ण श्रावण मासात भाविक विविध प्रकारे जप, तप, साधना करतात. श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी श्रींची मोठी मूर्ती पालखीत बसवून छबिना काढला जातो. यावेळी संतमंडळींचे भजन सुरू असते. आबालवृद्ध दर्शनासाठी येतात. छबिना शांत झाल्यावर साखरेचा प्रसाद भाविकांना वाटला जातो. श्रावणातील इतर सोमवारी याच पद्धतीने सोहळा होतो, मात्र यावेळेला पालखीमध्ये उत्सवमूर्ती (लहान मूर्ती) असते. हा सोहळा मंदिरात होतो. श्री नागेश लीलामृत या ग्रंथाचे पोथीवाचन नियमितपणे केले जाते. यावेळी खर्गे महाराज, संतमंडळी, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. श्रावण महिन्यात दुपारी १२ वाजता चौघडा वादन असते. दिवसातून तीन वेळा हे चौघडावादन होत असते. माने कुटुंबिय हे वादन करतात.