Wadwal Nagnath

Our Festival

मोहोळ येथील यात्रा व वडवाळ येथील छत्री

श्रीक्षेत्र वडवाळ येथील यात्रेची सांगता झाल्यानंतर चैत्र अमावस्येला श्री क्षेत्र मोहोळ येथील श्रींच्या यात्रेस प्रारंभ होतो. अक्षय्य तृतीया दिवशी वडवाळ येथील श्रींच्या छत्रीचे मानकरी कोळी हे वडवाळ येथील नागनाथ मंदिरात रात्री ८ वाजता येतात. यावेळी खर्गे महाराजांची उपस्थिती असते. सर्व संतमंडळी भजन करतात. नंतर भजन म्हणतच छत्रीसह सर्वजण मदिराबाहेर येतात व रात्री ११ वाजता खर्गतीर्थ येथे जातात तेव्हा कोळी हे खर्गे महाराजांची परवानगी घेऊन वडवाळ-मोहोळ या पारंपारिक पालखी रस्त्याने साकी म्हणत जातात.

मोहोळ येथे खंडोबा मंदिरामध्ये गेल्यावर सर्वजण विसाव्यासाठी थांबतात. तिथे मोहोळचे मानकरी येतात. ते सवाद्य, शोभेचे दारुकाम करीत श्रींच्या छत्रींना मोहोळच्या श्री नागनाथ मंदिरात नेतात. श्रीक्षेत्र मोहोळ येथील खर्ग-गण हे प्रमुख सोहळे झाल्यानंतर वैशाख शुद्ध अष्टमीला श्रींच्या छत्रीचे श्रीक्षेत्र मोहोळकडून श्रीक्षेत्र वडवाळकडे प्रयाण होते. सर्व मानकरी गवत्या मारुती मंदिरापर्यंत या छत्रीसोबत येतात व तेथून छत्रीचे वडवाळकडे प्रयाण होते. रात्री ८ वाजता वडवाळ येथील खर्गतीर्थावर छत्रीचे आगमन होते. तेथून पुन्हा भजन म्हणत, शोभेचे दारुकाम करत श्रींच्या मंदिरात छत्री येते.