श्री नागेश भक्तांसाठी ‘महाशिवरात्री’चा सोहळा एक पवित्र साधनाच असते. ॐ नमः शिवाय, नागनाथ महाराज की जय असा जयघोष करीत पहाटे श्रींच्या मूर्तीस खर्गेमहाराज, गावातील सर्व मानकरी, पुजारी, भाविकांच्या उपस्थितीत महाअभिषेक संपन्न होतो. यानंतर ‘नागेश महात्म्य’ ग्रंथाचे सामुदायिक पारायण करण्यात येते. सायंकाळी ‘मोरे’ या मानकरी घराण्यातील सुवासिनी महिला पारंपारिक पोषाख परिधान करून श्रींची मनोभावे आरती करतात. यावेळी मोरे घराण्यातील पुरुष हातात दिवटी घेऊन सहभागी झालेले असतात. यावेळी श्री नागनाथांचा जयजयकार केला जातो.