Wadwal Nagnath

Wadwal-Nagnath-4-in-1

श्री नागनाथ मंदिर माहिती व इतिहास

“ज्यांना न घडे काशी त्यांनी यावे वडवाळाशी” असे स्थानमहात्म्य असलेल्या वडवळ येथील श्री नागनाथाचे भव्य व सुबक हेमाडपंथी मंदिर श्री एकलिंग तेली यांनी बांधले आहे. मंदिराला एकूण तीन दरवाजे आहेत. मुख्य दरवाजा मोठा असून इतर दोन दरवाजे लहान आहेत. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार (याला नागेशभक्त दिल्ली दरबार असे म्हणतात.) मधून भाविक आत येतात. सर्वप्रथम श्री एकलिंग तेली यांची संजीवन समाधी नजरेस पडते. त्यानंतर पुढे श्री नागनाथांचे गाभाऱ्यातील दर्शन होते. गाभाऱ्यात श्रींच्या दोन मूर्ती आहेत. (भाविक यांना थोरला देव व धाकटा देव असे संबोधतात.) याच गाभाऱ्यात श्रींचे स्थान असून श्री नागनाथांनी आपले अवतार कार्य संपवण्यापूर्वी तूरभूजीवर एक उजवे पाऊल याठिकाणी उमटवले आहे. ‘तूरभूज’ म्हणजे श्रींची मूर्ती ज्यावर ठेवली जाते ते स्थान. श्रींच्या मूर्तीसमोर अखंड तेवत राहणाऱ्या दोन समई आहेत. 

यात्रा कालावधीत व इतर धार्मिक कार्यक्रमाप्रसंगी या गाभाऱ्यामध्ये विविध विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडले जातात. श्रींची मूर्ती दक्षिणाभिमुख आहे. गाभाऱ्याच्या बाहेर समोरील बाजूस गणमठ (यावर यात्रेतील ‘गण’ या सोहळ्या दिवशी धार्मिक विधी पार पडत असतो. हे पवित्र स्थान असल्याने यावर कुणीही बसू नये अशी श्रद्धा आहे.) आहे. मंदिरातच धनगर देशमुखाची ओवरी, गुरुगादी धानम्मा देवीचे मंदिर, नागेशभक्त आलमखान यांच्या घोड्याची समाधी, संतकवी उद्धव-चिद्धन यांची संजीवन समाधी, श्री बापूजी महाराजांची ओवरी आहे. मंदिराच्या मुख्य दरवाजामधून प्रवेश करताच डाव्या हाताला मोठा नगारा आहे. श्रींच्या धार्मिक कार्यक्रमात याचे वादन केले जाते. या नगाऱ्याच्याच भिंतीशेजारी मंदिराच्या वर जाण्यासाठी अगदी एकावेळी एक व्यक्ती जाईल असा पायऱ्यांचा जिना आहे. वर गेल्यावर प्रथम चौघडा वादन करण्यासाठीची जागा दिसते. गावातील माने कुटुंबियांना हा चौघडा वादनाचा मान आहे. ही सेवा आजतागायत अखंड सुरू आहे. मंदिराचे शिखर घुमटाकार असून त्यावर विविध मूर्ती सुबकपणे कोरलेल्या आहेत. घुमटाकार शिखराच्या आत जाण्यासाठी एक छोटा मार्ग आहे. या शिखरावर कळस आहे. श्रींच्या यात्रेमध्ये या कळसाचे महत्त्व आहे. श्री नागनाथाचे हे प्राचीन व भव्य मंदिर आहे. समोर असणारी भव्य दीपमाळही भाविकांचे लक्ष वेधून घेते. मंदिराच्या समोरच वीरभद्राचे छोटे मंदिर आहे.

वडवळमधील धार्मिक स्थळांचे महात्म्य

खर्गतीर्थ, मुंगीचा धोंडा, तिमण्णा धनगर समाधी, वरदबसवराज, एकलिंग तेली समाधी, वटवृक्ष, गोपाळकृष्ण मंदिर यांसारख्या वडवळ येथील धार्मिक स्थळांचे महात्म्य आणि आख्यायिका विस्तृत स्वरूपात खालील लिंकवर श्री नागेशभक्तांसाठी उपलब्ध आहेत.

श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटी

श्रींचे मंदिर देखभाल व भाविकांना वेळोवेळी विविध सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने १९५४ साली श्री नागनाथ देवस्थान पंचकमिटीची स्थापना करण्यात आली. वर्षभरातील श्रींचे विविध धार्मिक उत्सव याप्रसंगी भाविकांची असणारी उपस्थिती याचा विचार करून त्याबाबतचे नियोजन पंचकमिटी करीत असते. नुकतेच देवस्थान पंच कमिटीने भाविकांची राहण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून हनुमान मंदिराच्या जवळ प्रशस्त जागेवर भव्य असे भक्त निवास बांधण्यात आले. याठिकाणी वाहन पार्किंग, २४ तास पाण्याची सोय, दोन हॉल, २५ खोल्या उपलब्ध आहेत. यामुळे दूरवरून आलेल्या भाविकांची राहण्याची उत्तम सोय सध्या होत आहे. देवस्थान पंचकमिटीने इतर गोष्टींचा विचार करून भक्त निवासाच्या पाठीमागे भव्य असे सभागृह उभारले असून याठिकाणी आता लग्न सोहळे, साखरपुडा, नामकरण आदी उत्सव नाममात्र दरात साजरे करता येणार आहेत. त्यामुळे मुख्य मंदिरामध्ये आता लग्न व इतर सोहळे कायमस्वरुपी बंद करण्यात आले असून भाविकांना केवळ दर्शनासाठी हे मंदिर उघडे असणार आहे. सभागृहाजवळ भव्य असे प्रसादालय बांधण्यात आले आहे. याठिकाणी भोजन, अन्नदान केले जाते.

Bhakta Niwas
Sabhagruha

Our Testimonials

Inspirational words from our very satisfactory clients